खर
तर हे post लिहायचे
एकमेव कारण म्हणजे
जे पत्र मी
आईला लिहिले आहे,
त्याचे documentation करून ठेवणे. उद्या कदाचित माझ्याकडून
लिहिलेला कागद फाटून
जाईल आणि ह्या
पत्राची copy राहणार नाही म्हणून
हा खटाटोप.
॥ श्री ॥ २९ -१० - २०१२
तिर्थरूप आईस,
शिरसाष्टांग नमस्कार. खर तर माझं पत्र
बघुन तुला आश्चर्य वाटलं असेल. मराठी हस्ताक्षरही
आत्ता पुर्वीसारखा वाचता
येईल इतक सुबक राहीलं नाही. इथे
Chennai ला येउन दोन
महीने होत आले. फोनवर कितीही बोललो
तरी सविस्तर म्हणावं असं आपला बोलणं
झालं नाही, म्हणुन म्हटले
पत्रच लिहू. तशी आपली "सविस्तर" बोलण्याची परंपरा मोठी
आहे आणि घरातले
बरेच वाद आपल्या
दोघात झाले अहेत.
मागे जेव्हा TCSच्या
ट्रेनिंगला गेलो होतो
तेव्हा पत्र लिहीण्याची वेळ
आली होती, त्या नंतर आत्ता… त्यात आणखी एक
बर म्हणजे पत्रात फक्त
मलाच बोलता येता,
तुला बोलण्याची संधी (आणि ते
बोलणं ऐकण्याचा ताप…
नेहा तुला सांगू
शकेल) हे दोन्ही
टाळता येत !!
खर
तर पत्र लिहावं असं विशेष काही नाही, पण बरेच
दिवसात लिहीन,लिहीण (न
आणि ण दोन्ही
वापरले आहे, बरोबर
कोणता आत्ता आठवत
नाही) म्हणत होतो.
काल इथल्या एका
चौपाटीवर फिरायला गेलेलो तेव्हा
मुंबईची, सगळ्यांची खूप आठवण
आली, सर्वात जास्त
तुझीच आली, का
खर तर माहित
नाही, पण तुझ्याशी
बोलायचा राहून गेलंय हे
जाणवलं आणि मग ठरवलंच
की पत्र लिहीन.
पत्र
लिहायची सवय खर
तर अरविंद मामाची
देणगी. तो भोपाळं
ला असताना त्याने
मी scholarship परीक्षा पास झाल्यावर (४ थीची),
मला एक पत्र
लिहिले होते. त्याचे हस्ताक्षर
आत्ता डोळ्यासमोर येते
आहे आणि मग
माझे हस्ताक्षर कित्ती
बिघडले आहे ह्याची
जाणीव होते. त्याने
पाठवलेल्या पत्राला उत्तर म्हणून
तू माझ्याकडून लिहून
घेतलेल्या पत्रामुळेच खर तर
पत्र लिहायची सवय
लागली. बोलून कदाचित माझ्या
भावना (माझ्या काय किंवा
यतीन नेहाच्या काय )
निट मांडता येणार नाहीत
पण हे अरविंद,
प्रविण, रवि मामांचे ,
बाळूकाका, बाय,सुरेखा मावशी या सर्वांचे
उपकार कोणत्या जन्मात
फेडता येणार देव
जाणें.
चेन्नईला
येउन दोन महिने
झाले आहेत, तर
चेन्नईबद्दल काय म्हणतो
असा प्रश्न पडला
असेलच. खर सांगायाचं तर चेन्नई
इतकी वाईट नाही
आहे. मागे TCS च्या
वेळी आलेलो त्यापेक्षा
बरी अहे. पहिले
काही दिवस स्थिर
व्हायला वेळ गेला,
पण वाटले पूर्व
जन्मीचे नक्कीच काही असणार
नाहीतर पुन्हा इथे येणे
झाले नसते. मुंबईची
खूप आठवण येते,
सिद्धिविनायक, दादर चौपाटी,
माझे सगळ्यात जास्त
आवडते शिवाजी पार्क,
सगळ आठवत राहात,
पण ठीक अहे.
आत्ता आलोच आहे
तर इथलाही अनुभव
गाठीशी घेईन म्हणतो
शेवटी आयुष्य म्हणजे
एक एक अनुभव
गोळा करत जाणेच
आहे, नाही? माझ्या
सुदैवाने roomates आणि मित्रही
चांगले मिळाले आहेत. त्यामुळे
काळजी करावी असे
काही नाही. जेवण
मनासारखा नाहीच आहे, पण
एक गोष्ट कळली
आहे (यतीनलाही कळली
असेल) मनासारखा जेवण
फक्त तुझ्या हातच
जेवण्यात आणि मनासारख
घर फक्त सगळ्या
जबाबदाऱ्या विनातक्रार पार पाडणाऱ्या
पप्पांच्या पंखाखालीच आहे.
घरापासून
दूर गेल्यावरच कळत
घर - घर म्हणजे
काय आहे ते. कधीतरी शनिवार रविवारच
जेवण करून खिडकीत
उभा असतो तेव्हा
आठवत तुझं हजार कपडे
धुवून बाहेर येणं,
एकटीन मग जेवायला
बसणं आणि त्यात
माझ्यासारख्याने येवून TVच्या channelवरून
तुझ्याशी वाद घालणं.
तू आणि पप्पांनी किती कष्ट
घेतले आहेत हे
इथे आल्यावर छोटी
छोटी कामं करताना
जाणवत. कदाचित मी हे
समोरासमोर बोलूही शकणार नाही
पण म्हणून जाणीवच
नाही असे नाही.
एक मुलगा म्हणून
मी तुला आनंदाचे
किती क्षण दिले (तुला काय
नी पप्पांना काय) हे
डाव्या हाताच्या बोटांवरही मोजता
येइल, ह्या सगळ्याची
जाणीव चेन्नईने करून
दिली.
मी "एक गोष्ट"
मनावर घेतली आहे
आणि त्या दिशेने
प्रयत्नही सुरु केले
अहेत. खरं तर "हे" फक्त तुझ्यामाझ्यातलंच.
बाकी कोणाला त्याचे
मुल्य कळले असेल
कि नाही ह्याबद्दल
शंकाच आहे. T. चंद्रशेखर
ते म्हैसकर दाम्पत्य आणि अशी
बरीच उदाहरणं तू
मला पूर्वी पासून
द्यायचीस. खरं तर
तेव्हा नीट समजलच
नाही की तुला काय म्हणायचं,
काय दाखवायचं. आत्ता समजलय तर
मनात खोलवर कुठेतरी
भीती आहे कि
ह्या सगळ्याला उशीर
तर नाही झाला.
देवाकडे प्रार्थना करतो त्याचा
काही भाग हाच
असतो कि आत्ता
समजले आहे तर
यश दे.
आठवतंय,
लहानपणी जेव्हा सचिन तेंडूलकर
शतक मारायचा तेव्हा
तू मला मुद्दाम
म्हणायचीस "बघा ह्याने
आपल्या आईची कूस
उजळली." मी तुला,
जगाला अभिमान वाटावा
इतका मोठा तर
नाही झालो पण
जर कधी "जे
व्हायचे आहे ते"
झालोच तर तुझ्यासाठी
काही केल्याचा समाधान
आयुष्यभर पुरेल इतका असेल.
आत्ता
मागायचे तर काय
आणि कित्ती हा
प्रश्नच आहे पण
देणारच असशील तर आशीर्वाद
दे कि यशस्वी
होईन, सन्मार्गाने जाईन
आणि शक्य असेल
तितक्या लोकांचे भले करेन.
हल्लीच IBN लोकमत वर great भेट
मध्ये निखिल वागळेने
एका IAS officerची मुलाखत
घेतली. तिने सांगितले कि
तिच्या वडिलांनी तिला सांगितले
होते कि तुम्ही
एकदाच ठरवायचं की,
कौरव व्हायचं की
पांडव. एकदा ठरवलात
की पांडव व्हायचं,
तर मग लक्षागृह
जळल, राज्य गेलं
ह्या गोष्टी घडणारच,
पण आपण आपला "सन्मार्ग" सोडायचा नाही. आशीर्वादच
असा दे कि
आयुष्यभर पांडव राहू शकेन.
स्नेहलच्या
लग्नाबद्दल सुद्धा बोलण्यासारख खूप
काही आहे, पण
ते आपण भेटल्यावरच
बोलू. जे काही
झाल ते का
झाल आणि इतकं
टोकाला जाण्यापर्यंत खरच गरज
होती का ह्या
प्रश्नांची उत्तर आत्ता ज्याने
त्याने स्वत:ला
द्यावीत. माझ्यापरीने एक भाऊ
आणि एक भाचा
ह्यापेक्षा एक माणूस,
जबाबदार व्यक्ती म्हणून मी
माझी भूमिका मांडली,
बजावली. शेवटी दैवाचा एक
टक्का असतोच आणि
त्याप्रमाणेच होते हे
ही खरच. फक्त
एक गोष्ट सांगावीशी
वाटते ती अशी
की हल्ली माणस
खूप बेजबाबदारीने वागतात
असे जाणवते. बेजबाबदारीपेक्षा आपली जबाबदारीच
ओळखत नाहीत.
आज
तू आणि पप्पा
एका अशा stageला
आहात जेव्हा तुमची
तिन्ही मुलं "मार्गाला" लागली अहेत. नाही
म्हटलं तरी फक्त
शाळेत जायला उशीर
झाला आणि मळमळतय,
खांदा दुखतोय अशाच
तक्रारी अहेत. पण ह्याच
बरोबर वेळ आहे
ती यतीन आणि
नेहाचे लग्न जुळवण्याची.
कितीही टाळले तरी न
टाळता येणारी जबाबदारी. आपली
जबाबदारी योग्य वेळेत ओळखून
ती तुम्ही पार
पाडाल अशी आशा
आहे.
दिवस
कसे झरझर निघून गेले,नाही ? आम्हाला
भाड्याची सायकल घेऊन आमच्या
मागे पाळणारे पप्पा,
दिवाळीला गच्चीत फटाके उडवायला
न्हेणारे , शाळेची तयारी करनारे
पप्पा डोळ्यासमोर आले
कि डोळे जड होतात …. (थांब पुसतो,
नाहीतर लिहिता नाही येनार
…) तुही काही कमी नाहीस,
एका चौकोनात उभे करून पाढे
पाठ करायला लावलेस,
माझे मळलेले कपडे अगदी
फाटेपर्यंत धुतलेस. हल्ली पुरणपोळ्या,
शंकरपाळ्या पण एकदम
मस्त बनवायला लागली
अहेस… आणखी काय
काय लिहु… पत्रात
तुला बऱ्याच गोष्टी आठवयाला
सांगितल्या आहेत, त्यालाच अनुसरून
सौमित्रच्या संग गारव्यातल्या
कविताने पत्राचा शेवट करतो
आत्ता तुला सगळ जुनं आठवेल कि नाही कुणास ठाऊक
आत्ता तुला सगळ जुनं आठवेल कि नाही कुणास ठाऊक
आपले शहर
गर्दीचा कहर
शोधता शोधता आपणच मग हरवायचो
एकमेकांची आठवण काढत खूप एकटे फिरायचो
जसे एकाच ट्रेन मध्ये वेगली डब्यात शिरायचो
अधून मधून दूर जायची आपली सवय तिथली
तुझं गाव कुठलं आणि तुझी पायवाट कुठली
एकमेकांची उगीच अशी चेष्टा करायचो
गोंधळलेले आपले चेहरे हसत हसत पाहायचो...
तीच चेष्टा खरी होईल कधीच वाटलं नव्हतं
गर्दीत तेव्हा डोळ्यात कधी पाणी दाटला नव्हतं
आत्ता वय निघून चाललंय हलक्या हलक्या पावलांनी
त्यात मला वेढलंय पुन्हा तुझ्या जुण्या सावल्यांनी
एक एक सावलीत उन्हासारखा सार लख्ख आठवतंय
एकट्यामधून उठवून मला गर्दीत कोणी पाठवतय
मी उठून यॆइनही
मागे वळून पाहिनही
मलाच शोधत राहिनही
गर्दीत हरवून जाईनही
तुला मात्र कोणी तुझ पाठवेल कि नाही कुणास ठाऊक
आलीस तरी तुला सगळ जुनं आठवेल कि नाही कुणास ठाऊक...
आत्ता तुला सगळ जुनं आठवेल कि नाही कुणास ठाऊक
"आत्ता तुला सगळ जुनं आठवेल कि नाही कुणास ठाऊक...!!!"
पत्राला उत्तर नाही दिलेस तरी चालेल. तुझे शब्द तू न बोलता समजण्या इतका मोठा झालोय मी !!
तुझा ,
(हट्टी, हेकेखोर आळशी, चाणक्य, manager, चांदोरकर, भाई जगताप, वागळे ..
आणि तरीही येणारा प्रत्येक जन्म तुझ्याच पोटी मिळावा अशी ईच्छा करणारा ) ….
निखिल चंद्रकांत विचारे